जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संगमेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिरंदवणे नं. १ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेतील शिक्षक सचिन इंगळे यांनी भूषविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मा. इंगळे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील विविध प्रेरक प्रसंगांवर प्रकाश टाकला.
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या घोषणेवर लिहिलेल्या लेखाचे वाचन योगेश मुळे यांनी केले. यावेळी ‘मनुस्मृती’ जाळणे ही केवळ ऐतिहासिक घटना नसून तो सामाजिक समरसतेचा संदेश होता असे मत त्यांनी व्यक्त केले. बाबासाहेब आपल्या कर्मनिष्ठेमुळेच आजही लोकांच्या स्मरणात आहेत असे सांगत केंद्रप्रमुख संतोष चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय भाषणातून श्री. इंगळे यांनी भारतीय संविधान निर्मितीमागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या सर्व सदस्यांच्या उदात्त दृष्टिकोनाचा उहापोह केला. बाबासाहेब केवळ कोण्या एका जातीधर्माच्या भिंतीत बंदिस्त होऊ शकत नाहीत तर ते सकल समाजाचे दीपस्तंभ आहेत अशा शब्दांत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यानंतर आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


