कुर्धे येथे एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची (एनएसएस) स्वयंसेवकांनी तालुक्यातील कुर्धे येथे पावसात बंधारा बांधला. मात्र तो वाहून गेला, तरीही विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. पाऊस गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा श्रमदान करत हा बंधारा बांधून पूर्ण केला असून यात आता मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे.
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर कुर्धे येथे झाले. त्यावेळी नदीवर ८० विद्यार्थ्यांनी ४० फुटी बंधारा बांधला. शिबिरानंतर पडलेल्या अतिवृष्टीमुळे व लांबलेल्या पावसामुळे हा बंधारा वाहून गेला. पण विद्यार्थ्यांनी हा बंधारा पुन्हा बांधण्याकरिता एक दिवस श्रमदान केले आणि ४० फुटी बंधारा परत बांधला.

गावातील पाणीसाठा बरेच काळ टिकवा पाणी साठ्यामध्ये वाढ व्हावी याबरोबरच विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व समजावे आणि योग्य संस्कार व्हावेत हा त्या पाठीमागचा उद्देश होता. बंधार्याला माजी स्वयंसेवकांचे देखील योगदान आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी सचिन सनगरे आणि त्यांचे स्वयंसेवक, कनिष्ठ महाविद्यालयातील माजी कार्यक्रमाधिकारी निनाद तेंडुलकर आणि प्रभात कोकजे उपस्थित होते.
गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. या बंधाऱ्यामुळे गावातील विहिरींच्या पाणीसाठा नक्कीच वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य श्री. गोसावी, पर्यवेक्षक केळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.



