अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तहसील कार्यालयाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नदी-नाले, पूल आणि धबधब्यांपासून दूर राहा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

राजापूर : तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राजापूर तहसील कार्यालयाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे तसेच धरण परिसरातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी नदी, नाले, पूल, धबधबे तसेच पूरग्रस्त भागात जाणे टाळावे. पाण्याचा वेग अधिक असलेल्या ठिकाणी रस्ता किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रे, औषधे, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. तसेच वीजेच्या तारा, विद्युत उपकरणे आणि पाण्यातील विद्युत धोक्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. केवळ प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक ग्राम प्रशासन, पोलीस, महसूल विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करत “आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सतर्क राहावे,” असे राजापूर तहसील कार्यालयाने म्हटले आहे.



