पुराच्या पाण्यात अडकलेल्या दुचाकीस्वाराला गुरव बंधूनी दिले जीवदान
प्रसंगावधान आणि धाडसी बचावकार्यामुळे अनर्थ टळला

राजापूर : शहरातील उन्हाळे येथील श्री स्वामी समर्थ मठासमोरील मोरीवरून वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका दुचाकीस्वाराचे प्राण गुरववाडी येथील वैभव गुरव आणि जगदीश गुरव या बंधूंनी प्रसंगावधान राखत वाचविले. त्यांच्या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही घटना गुरुवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. फुपेरे येथून दुचाकीवरून राजापूरकडे येत असलेले जाधव (वय ४२) हे मोरीवरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते मोरीत अडकले. पुराच्या प्रवाहात दुचाकी काही अंतर वाहून गेली, तर जाधव यांनी एका छोट्या झाडाचा आधार घेत जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली.
याचवेळी मुंबई–गोवा महामार्गावरील रेल्वे फाटकाच्या दिशेने जात असलेले वैभव गुरव आणि त्यांचे बंधू जगदीश गुरव यांना मोरीजवळ पडलेली दुचाकी दिसली. संशय आल्याने त्यांनी तातडीने वाहन थांबवून परिसरात शोध घेतला. त्यावेळी पुराच्या पाण्यात झाडाला धरून मदतीसाठी आर्त हाका मारणारे जाधव त्यांच्या निदर्शनास आले.
बचावासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसतानाही दोन्ही भावांनी धाडस न गमावता झाडांच्या वेलींचा तात्पुरता दोर तयार केला. त्याच्या साहाय्याने त्यांनी जाधव यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सुखरूप बाहेर काढले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात यश मिळविले.
सुखरूप बचावल्यानंतर भावूक झालेल्या जाधव यांनी गुरव बंधूंना मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली. “आज तुम्ही वेळेवर धावून आला नसता, तर मी जिवंत राहिलो नसतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गुरव बंधूंनी दाखविलेल्या धाडस, प्रसंगावधान आणि माणुसकीमुळे एक जीव वाचला असून, त्यांच्या या कार्याचे राजापूर परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पूल, मोरी किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्यातून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.


