सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा करा
पालक सचिव सीमा व्यास यांचे आवाहन

रत्नागिरी : मालगुंडला प्राणीसंग्रहालय होत आहे, ही अतिशय चांगली आणि मला आवडलेली कल्पना आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यपूर्ण दृष्टीकोनातून स्मार्ट सिटीची कामे करून भर घालावी, असे सांगतानाच सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास यांनी दिले.
जिल्ह्यातील १०० कोटी व त्यापेक्षा अधिकच्या कामांच्या अनुषंगाने तसेच नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रस्तावित कामांबाबत श्रीमती व्यास यांनी आज (१६ फेब्रुवारी) आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीमती व्यास यांचे स्वागत केले. त्यानंतर महावितरण, एमआयडीसी, पत्तन, एमएसआरडीसी, एमएमबी या विभागांनी संगणकीय सादरीकरण केले. नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत कामांबाबत श्री. पाटील यांनी सादरीकरण केले.
श्रीमती व्यास म्हणाल्या, “मालगुंड येथे प्राणी संग्रहालय ही अत्यंत चांगली कल्पना आहे. आपल्या काही अधिकाऱ्यांना देशातील मोठ्या प्राणी संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी पाठवावे. हा चांगला प्रस्ताव आहे, तो मला खूप आवडला. त्याबाबतचे नियोजन देखील अत्यंत चांगले करावे. स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी स्वारस्य घेऊन काम करावे. नैसर्गिक सौंदर्य मिळालेल्या जिल्ह्यामध्ये या कामांमुळे अधिक भर पडेल, अशा पद्धतीची चांगली कामे करावीत.”
“एमएसआरडीसीने नियोजित वेळेत आणि नियोजित बजेटमध्ये कामे पूर्ण करावीत. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी वैशिष्ट्यपूर्ण कामे असावीत. नित्याची नेहमीची कामे नसावीत. सुधारित भात, नाचणी बियाणांचे वितरण केलेल्या शेतकऱ्यांकडून कृषी विभागाने माहिती घेवून तांत्रिक दृष्ट्या संशोधनात्मक अहवाल सादर करावा, असेही त्या म्हणाल्या.



