पाली विभागातील एसटी बस फेऱ्या बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल

पाली : रत्नागिरी आगारातून सुटणारी रत्नागिरी-चोरवणे ही रात्रवस्तीची एसटी बस अनियमितपणे सोडली जात असल्याने सकाळच्या सत्रातील शालेय विद्यार्थी व प्रवाशांची या बस अभावी मोठी गैरसोय होऊन नुकसान होत आहे. त्यामुळे ही खंडित होत असलेली महत्त्वाची बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व प्रवाशातून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी-चोरवणे या रात्र वस्तीच्या एसटी बसची सकाळी ६ वाजता चोरवणे ते पाली अशी पहिली फेरी असते. तेथून दुसरी फेरी सकाळी ०६.१५ वाजता पाली ते वेळवंड तेथून पुन्हा तिसरी फेरी सकाळी ०७.१० वाजता पाली ते नागलेवाडी अशा शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन स्थानिक फेऱ्या नियोजित आहेत. त्यानंतर सकाळी ७.४५ व १०.१५ वाजता पुन्हा पाली ते रत्नागिरी अशा दोन फेऱ्या प्रस्तावित वेळापत्रकात आहेत. प्रत्यक्षात मात्र ही बस रत्नागिरी आगारातून रात्रवस्तीसाठी चोरवणे येथे गेले काही दिवस नियमितपणे सोडली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या हंगामात मोठे नुकसान होत आहे.
या बस सेवेवर चोरवणे, नाणीज, कशेळी, खानू, पाली, चरवेली, वेळवंड, नागलेवाडी या भागातील विद्यार्थी अवलंबून असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. या बसला नियमित फेर्याना उत्तम भारमान आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ही बस फायदेशीर आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्वरेने या बस फेऱ्या नियमित व्हाव्यात अशी मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाकडे जि. प. समाजकल्याण सभापती अॅड. सुयोग कांबळे यांनी केली आहे.



