कोकणमुख्य बातमी

कवीने वैयक्तिक अनुभव वैश्विक पातळीवर मांडल्यास निर्मिती दखलपात्र होते : अजय कांडर

ओरोस येथे 'आषाढसरी' कविसंमेलनात मांडले विचार

सिंधुदुर्गनगरी : “वैयक्तिक स्वरूपाच्या भावना, वेदना आणि अनुभव सार्वत्रिक स्वरूपात मांडले की त्याला वैश्विक रूप प्राप्त होते आणि अशी कविता किंवा साहित्य दखलपात्र होते,” असे मत ‘आवानओल प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी अजय कांडर यांनी येथे व्यक्त केले.

ओरोस येथील ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठातर्फे कवी कालिदास दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘आषाढसरी’ कवीसंमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी ‘आम्ही साहित्यप्रेमी’चे समन्वयक सतीश लळीत, डॉ. सई लळीत, शंकर कोकितकर, मधुकर मातोंडकर, संतोष कदम, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला राजर्षि छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे. श्री. कांडर यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन संतोष कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्री. कांडर म्हणाले की, “कविता हा साहित्यप्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. कविता मोठ्या प्रमाणात लिहिली जाते आणि सादर केली जाते. ठिकठिकाणी सातत्याने कवीसंमेलने होत असतात. मात्र कवीने कवितेमधून आपला अनुभव किंवा वेदना मांडताना ‘मी’ आणि ‘मीपणा’ यामध्ये अडकू नये. त्याला सार्वत्रिक आणि व्यापक स्वरूप दिले तर ती साहित्यकृती रसिकांना अधिक भावते. काव्यलेखन करताना ही बाब लक्षात घेऊन केवळ आकर्षक शब्दरचना करून शाब्दिक कसरती करण्यात कवीने अडकता कामा नये. लोकल ते ग्लोबल ही संकल्पना काव्यलेखन करताना लक्षात ठेवावी. नाहीतर काव्य प्राथमिक पातळीवरच राहण्याचा धोका संभवतो.”

यावेळी श्री. कांडर यांनी आपली ‘बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता सादर केली. या अत्यंत लोकप्रिय कवितेबाबत बोलताना ते म्हणाले, “कळशीभर पाण्यासाठी वणवण करणारी माझी आई मी बालपणी पाहिली. यावरची कविता लिहिताना मी केवळ माझ्या आईची वेदना मांडण्यावरच थांबलो नाही तर पाणी पाण्यासाठी वणवण करावी लागणे, ही समस्त स्त्री वर्गाची वेदनादायक गोष्ट होती. त्यामुळे ही वेदना मी समस्त स्त्रीवर्गाची म्हणून कवितेतून मांडली. ‘मौज या अत्यंत प्रतिष्ठित दिवाळी अंकात प्रकाशित झालेली ही कविता आज राज्यभरात नव्हे तर देशभरात पोचली आहे. नवोदित कवींनी ही बाब लक्षात घ्यावी,”

ओरोससारख्या ठिकाणी साहित्यविषयक कार्यक्रम सुरू करण्याची ‘आम्ही साहित्यप्रेमी’ची संकल्पना अतिशय स्तुत्य आहे, असे सांगून श्री कांडर म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे छोटे-मोठे साहित्यविषयक कार्यक्रम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. या संस्थांनी आणि असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या, त्यात सहभाग घेणाऱ्या साहित्यिक आणि रसिकांनी एकमेकांना जोडून घेतले पाहिजे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील साहित्यिक चळवळ बळकट होण्यास मदत होईल.”

प्रास्ताविकात सतीश लळीत यांनी वेगवेगळ्या कवींनी आपल्या कवितांमधून पावसाचे कसे वर्णन केले, याचा आढावा घेतला. पाऊस किंवा वर्षा ऋतु हा कवींचा अतिशय आवडता आहे. या ऋतुवर जेवढ्या कविता आहेत, तेवढ्या अन्य कोणत्याही ऋतुवर नाहीत. याचे कारण पावसाळा हे सृजनाचे रुप आहे. हा ऋतु जगण्यामरण्याशी निगडीत आहे, यामुळे अन्य कोणत्याही ऋतुपेक्षा हा ऋतु मानवी मनाला आणि कवींना सर्वाधिक भावतो, असे ते म्हणाले. डॉ. सई लळीत यांनी श्री. कांडर यांचा परिचय करून दिला.

आषाढ महिन्याच्‍या पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या या ‘आषाढसरी’ कविसंमेलनात तब्बल २५ कवींनी सहभाग नोंदवला आणि रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत सभागृहात कवितांच्या सरी बरसल्या. संध्या तांबे, सई लळीत, शंकर कोकितकर, मधुकर मातोंडकर, पुरुषोत्तम लाडू कदम, संतोष कदम, सुरेश पवार,  मनोहर सरमळकर, राजेंद्र गोसावी, सुस्मिता राणे, सुधीर गोठणकर, श्रीराम चव्हाण, प्रगती पाताडे, मेघना उपानेकर, मिताली मुळीक, आर्या बागवे, नम्रता रासम, मधुकर जाधव, विद्या पाटील, सत्यवान कदम, शरद पाट्येकर, सीमा मसुरेकर यांनी कविता सादर केल्या. फोंडाघाट येथून आलेले संजय तांबे आणि युवा कवी अथर्व रासम याची कविता रसिकांना भावली. श्रीमती नेत्रा दळवी यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!