महाराष्ट्रमुख्य बातमी

बारावीचा निकाल ५ मेपर्यंत, दहावीचा निकाल १५ मे पूर्वी

मुंबई : बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी यंदा अनुक्रमे १० फेब्रुवारी ते ११ मार्च आणि २० फेब्रुवारी ते १८ मार्च असा पार पडला होता. या दोन्ही परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलनही अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, बारावीचा निकाल ५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून दहावीचा निकाल १५ मे पूर्वी घोषित केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र वेगवेगळे न देता एकाच पानावर दिले जाणार आहे. या नवीन स्वरूपात विद्यार्थ्याचा फोटो आणि क्यूआर कोड समाविष्ट असणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यास विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध होणार असल्याने बनावटगिरीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या गुणपत्रिकांची छपाई प्रक्रिया सुरू असून निकाल लागल्यानंतर साधारण एका महिन्यात विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे मिळणार आहेत.

 

१७ मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

 

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेलाही गती मिळणार आहे. यंदाही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबवली जाणार असून १७ मेपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारे महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून कागदावरील आणि प्रत्यक्षातील विद्यार्थ्यांमधील तफावत टाळणे तसेच केवळ नावनोंदणी करून वर्गात न येणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणे, हा शिक्षण विभागाचा उद्देश असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!