जिल्हा परिषद येथे आरोग्यविषयक आढावा व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक प्रभावी व सर्वसामान्य जनतेपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी आढावा व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. आडकेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सखोल मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात पार पडली.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे कशा देता येतील, यासाठी डॉ. आडकेकर यांनी महत्त्वाच्या विविध आरोग्य विषयक बाबींचे संगणकीय सादरीकरण करत प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, सेवा वितरणातील पारदर्शकता, रुग्णकेंद्री सेवा पद्धती आणि आरोग्य यंत्रणेमधील समन्वय, उत्कृष्ट सनियंत्रण व पर्यवेक्षण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

या कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, तसेच प्र.जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. परवेज पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सर्व एनएचएम आरोग्य कार्यक्रम समन्वयक , सर्व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक आणि तालुका समूह संघटक, आशा गट प्रवर्तक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि प्रभावी आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.



