मुख्य बातमी

संगमेश्वरला ५ गाड्यांच्या थांब्याची शक्यता; कोकण रेल्वे बैठकीत सकारात्मक आश्वासन

संगमेश्वर : कोकण रेल्वे संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोडी समोर आल्या आहेत. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी स्थानिक मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

ही बैठक पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर’ या फेसबुक समूहाचे प्रमुख संदेश जिमन यांनी यावेळी CMD यांचे आभार मानले.

बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकावर एकूण ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्यासंदर्भात सकारात्मक प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार असून, त्यावर अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तसेच मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम स्पेशल या विशेष गाडीला संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनावरही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे गाड्यांतील डब्यांची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे. याशिवाय, स्थानकावर तिकीट तपासनीस (TC) यांची दररोज तपासणी सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होणार आहे.

या बैठकीस गंगाराम टोपरे, मुकुंद सनगरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीत पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन संतोष झा यांच्याकडे दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याची मागणी करण्यात आली, तर मांडवी एक्सप्रेस या गाडीला दिवा स्थानकावर थांबा देण्याची मागणीही करण्यात आली. यापैकी शिल्पकारांच्या नावाचा फलक लावण्यास तात्काळ मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयांमुळे संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि सेवा मोठ्या प्रमाणात सुधारतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!