महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राहुल कदम यांना सुवर्णपदक

चिपळूण : दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव (निम्मेगाव) येथील सुपुत्र राहुल विकासराव कदम यांनी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे टेरव गावासह संपूर्ण दसपटी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राहुल यांनी कठोर परिश्रम, जिद्द, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासातून आजच्या युवकांना प्रेरणा मिळत असून, क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
राहुल यांनी यापुढेही कुलस्वामिनी आई भवानी वाघजाईच्या कृपाशीर्वादाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश संपादन करून टेरव गाव, चिपळूण तालुका आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा समस्त टेरव ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून राहुल कदम यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



