मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा

राजापूर : शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मासेविक्री करत असताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अनधिकृत रस्त्यावरील मासेविक्रीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असून नगरपालिका प्रशासनाकडून त्याविरोधात कारवाई सुरू आहे. मात्र काही विक्रेते प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवाजी पथ ते बाजारपेठ परिसरात पालिकेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव आणि स्वच्छता निरीक्षक अमित पोवार हे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी कातळी सागवे येथील अनिसा रशीद फणसोपकर या बाजारपेठ परिसरात मासेविक्री करत बसल्या होत्या. पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना मच्छीमार्केटमध्ये जाऊन विक्री करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तेथेच विक्री सुरू ठेवली.
यानंतर कर्मचाऱ्यांनी मासळीची टोपली जप्त करून कार्यालयात नेण्यास सुरुवात केली असता संबंधित महिलेने त्यांच्या मागे धावत जाऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पालिका कार्यालयात जाऊन फिर्यादी राजन जाधव यांच्या हातातील मासळीची टोपली खेचून घेत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२१, ३५२, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम २६७, २६९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे मासेविक्री करू नये तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!