मुख्य बातमी

स्वातंत्र्यदिनी मिळालेला जिल्हा क्रीडा पुरस्काराचा धनादेश हरवला; प्रामाणिक नागरिकाने परत केला

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पोलीस परेड मैदानावर जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या खो-खो खेळाडू श्रेया सनगरे हिचा हरवलेला १० हजार रुपयांचा धनादेश एका प्रामाणिक नागरिकाने शोधून पोलिसांच्या मदतीने तिला परत मिळवून दिला. वैभव जाधव या तरुणाच्या या प्रामाणिकपणामुळे श्रेयाला तिच्या पुरस्काराचा योग्य सन्मान परत मिळाला असून, पोलीस प्रशासनानेही त्याचे कौतुक केले आहे.

स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते श्रेया सनगरे हिला खो-खो खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारासोबत तिला १० हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला. हा महत्त्वाचा धनादेश श्रेयाकडून नकळतपणे गहाळ झाला. हा धनादेश हरवल्याने ती चिंतेत होती.

दरम्यान, रत्नागिरी शहरातील तरुण वैभव जाधव यांना तो धनादेश रस्त्यात सापडला. धनादेशावर श्रेया सनगरेचे नाव आणि पत्ता पाहून त्यांनी तात्काळ तो धनादेश रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी उशिरा त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन हा धनादेश पोलिसांकडे सुपूर्द केला.

वैभव जाधव यांच्या या कृतीचे पोलीस दलाने विशेष कौतुक केले. एका प्रामाणिक नागरिकाने दाखवलेल्या या चांगुलपणामुळे हरवलेला धनादेश त्याच्या योग्य मालकापर्यंत पोहोचवणे शक्य झाले. पोलिसांनी तात्काळ श्रेया सनगरे यांच्याशी संपर्क साधून तिला धनादेश परत देण्याची कार्यवाही सुरू केली. रात्री उशिरापर्यंत हा धनादेश श्रेयाला सुपूर्द करण्यात आला.

आपल्या देशात अजूनही प्रामाणिक नागरिक आहेत, याचा अनुभव वैभव जाधव यांच्या कृतीतून पुन्हा एकदा आला आहे. त्यांच्या या कृतीने समाजात एक चांगला संदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!