पाटपन्हाळे महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

आबलोली (संदेश कदम) : मुंबई विद्यापीठाचा तृतीय वर्षे वाणिज्य वर्गाचा सत्र सहाचा निकाल १४ मे रोजी जाहीर झाला. यामध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयाने उत्तुंग असे यश मिळवून गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.
महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचा निकाल हा ५५ टक्के असून देखील महाविद्यालयाचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. यामध्ये दीक्षा ज्ञानेश्वर साळवी ८७.५० टक्के, अमृता दिलीप आंबेकर ८७ टक्के, वैष्णवी मुरारी साळवी ८२.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.

या परीक्षेमध्ये एकूण ६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. मिळालेल्या उत्तम अशा यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. देसाई यांनी विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी आणि प्रा. लंकेश गजभिये यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये शंभर टक्के निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांचा नियमित सराव, अतिरिक्त तास आणि वैयक्तिक लक्ष यामुळे इतके चांगले यश मिळाले असे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत यांनी सांगितले.



