रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरी; आरपीएफकडून आरोपीला अटक

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा मोबाईल चोरी करणाऱ्या एका संशयिताला रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) अटक केली आहे. ही कारवाई १२ मे रोजी करण्यात आली असून आरोपीकडून सुमारे १४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार आरपीएफकडे दाखल झाली होती. घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफच्या पथकाने स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरी करताना एक संशयित व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाल्याचे आढळले.
सीसीटीव्हीमधील वर्णन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाने स्थानक परिसरात शोधमोहीम राबवली. सहाय्यक उपनिरीक्षक दिगंबर सिंग आणि हवालदार सचिन गावडे यांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता चोरीस गेलेला मोबाईल आणि सिमकार्ड आढळून आले.
आरपीएफने जप्त केलेला मोबाईल व सिमकार्ड ताब्यात घेत आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.



