मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अवैध दारुविक्रीविरोधात अभिजीत गुरव यांची आक्रमक भूमिका

बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

राजापूर : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारुविक्रीविरोधात पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे लेखी निवेदन सादर केले आहे. पुढील १५ दिवसांत अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद न झाल्यास राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राजापूर तालुक्यात अवैध दारूधंद्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलिस प्रशासनाच्या कारभारात कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. गावोगावी खुलेआम गोवा बनावटीची दारू विक्री होत असून त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. या व्यसनामुळे काही तरुणांनी जीव गमावल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

यासंदर्भात बोलताना गुरव म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पोलिसांसोबत अवैध दारूविक्री करणाऱ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. तसेच १३ मे २०२६ रोजी झालेल्या जनता दरबारातही हा विषय उपस्थित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच काही दारू विक्रेते कारवाईदरम्यान एका मोठ्या लोकप्रतिनिधीचे नाव सांगून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या अवैध धंद्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

तालुक्यातील अवैध दारुधंदे १५ दिवसांत बंद करण्यात यावेत, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा देत याची सर्वस्वी जबाबदारी राजापूर पोलिस स्टेशनवर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!