मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुसळधार पावसाने दापोली जलमय 

घरांना पाण्याचा वेढा, रस्ते पाण्याखाली : प्रशासनाचे युद्धपातळीवर मदतकार्य

दापोली : तालुक्यामध्ये आज (५ जुलै) दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक सखल भाग जलमय झाले असून घरांना पाण्याचा वेढा घालण्याची परिस्थिती आहे. रस्ते पाण्याखाली गेले असून, झाडे कोसळणे, वीजपुरवठा विस्कळीत होणे अशा घटनांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका प्रशासन, नगरपंचायत, ग्रामपंचायती आणि आपत्कालीन यंत्रणांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.

दापोली शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, काळकाई कोड पुलाजवळील गुडलक स्टोअर परिसर, केळसकर नाका चौक, स्टेट बँकेसमोरील रस्ता, नशेमन कॉलनी मस्जिद परिसर तसेच गिम्हवणे येथील सहकारनगर गल्ली क्रमांक २ येथे गटारे तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दापोली-दाभोळ मार्गावरील स्टेट बँकेजवळ तसेच केळसकर नाका येथे वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका शिवानी खानाविलकर, अन्य नगरसेवक, नगरपंचायतीचे अभियंता सुनील सावके व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने पाण्याच्या निचऱ्याला मार्ग करून दिल्याने काही वेळातच साचलेले पाणी ओसरले. या कामात प्रमोद पांगारकर व स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले.

दापोलीजवळील जालगाव गावातील खलाटी परिसर, विद्यानगर, साईनगर व चैतन्यनगर येथे अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला. काही घरांत पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चैतन्यनगर येथील संतोष सागवेकर यांच्या घरातही पाणी शिरले. पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाधित कुटुंबांना धीर दिला. सरपंच अक्षय फाटक, उपसरपंच स्वप्निल भाटकर, ग्रामपंचायत सदस्य व आपत्कालीन पथकाने काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करून परिस्थितीची पाहणी केली.

खेड मार्गावरील टाळसुरे परिसरात पाण्यात अडकलेल्या दोन महिलांना आपत्कालीन पथकाने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. तसेच टाळसुरे येथील करमरकर कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर कायम असल्याने आणखी स्थलांतराची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.

गिम्हवणे येथील गजानन महाराज नगर परिसरातील दोन ते तीन घरांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले असून जालगाव ग्रामपंचायत परिसर, नवभारत छात्रालय रस्ता व नर्सरी रोडवरील गटारे तुडुंब भरून वाहत आहेत. कोडजाई नदी दुथडी भरून वाहत असून मेडिकल कॉलेजजवळील पूल पाण्याखाली गेला आहे. आसूद नदीला पूर आल्याने परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. आगरवायंगणी येथील रामाणेवाडीमध्ये गणेश जनार्दन रामाणे यांच्या घरालगतची संरक्षण भिंत वाहून गेल्याने अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे.

दाभोळ-दापोली मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. प्रशासनाने तातडीने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. हर्णै येथील शिवाजी चौक ते मराठी शाळा मार्ग पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली. हर्णैकडे जाणाऱ्या ३३ केव्ही वीजवाहिनीवर झाड कोसळून वीजखांब वाकल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला असून अतिवृष्टीमुळे दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, आंजर्ले व अडखळ परिसरातही झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी विविध बाधित भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. संपूर्ण तालुक्यात तहसील प्रशासन, आपत्कालीन विभाग, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक युवकांची मदत पथके तैनात करण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आवश्यकतेनुसार आणखी कुटुंबांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!