कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

रत्नागिरी : शेतकऱ्यांना खताचा, बियाणांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेच आहे. खताचा काळाबाजार होणार नाही, याचा दक्षता घ्या. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज (२० मे) जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सभापती महेश नाटेकर, सभापती नंदकुमार मुरकर, सभापती प्रणव पोळेकर, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यामध्ये २१ ठिकाणी शेल्टर हाऊस आहेत. याचा वापर भात खरेदी केंद्रासाठी करा. यावर्षी ४० हजार टन भात झाला आहे. तो ७५ हजार टन करण्यासाठी प्रयत्न करा. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळावित, याची दक्षता घ्या. खतासाठी शेतकऱ्यांना संघाच्या कार्यालयात जायला लागू नये. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते मिळाली पाहिजेत. आवश्यकता असल्यास वाहतुकीसाठी यंत्रणा तयार करा, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. खताचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घ्या. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खत पुरवठ्या संदर्भात सर्व्हेक्षण करा. रेल्वेने देखील स्थानिक शेतकऱ्यांसाठी आलेल्या खताला प्राधान्य द्यावे. नाविन्यपूर्णमधून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन देण्यात येतात, त्याबाबत कार्यवाही करा. शेतकऱ्यांना बियाणे वेळेवर मिळणे गरजेच आहे. फळपीक विमा, भात पीक विमा बाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा.
शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. त्याबाबत प्रचार, प्रसिध्द करावी. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्या. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे भात लागवड क्षेत्र, फळबाग लागवड क्षेत्र, औषधे, खते, बियाणे आदीबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.


