मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

हॉटेल ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरीप्रकरणी पोलिसांचा तपास वेगात

संशयितांची गाडी जप्त :  पाच मोबाईल हस्तगत

राजापूर : शहरानजीकच्या कोदवली पुनर्वसन वसाहतीतील हॉटेल फुडलँड येथून ग्राहक नोंदणी रजिस्टर घेऊन पसार झालेल्या चार संशयित आरोपींच्या वापरातील गाडी संगमेश्वर तालुक्यातील तुरळे येथे सावर्डा पोलिसांनी जप्त केली आहे. या गाडीतून पाच मोबाईल तसेच विविध हॉटेलमधील ग्राहक नोंदणीची पाच ते सहा रजिस्टर पोलिसांना आढळून आली आहेत. नाकाबंदीची माहिती मिळताच आरोपींनी गाडी महामार्गावर सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राजापूर, संगमेश्वर आणि सावर्डा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी राजापूरातील हॉटेल फुडलँड येथून सहा हजार रुपये रोख रक्कम लांबविली असून संगमेश्वरातील एका हॉटेलमधूनही साडेपाच हजार रुपयांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. संबंधित हॉटेल मालकांच्या तक्रारीवरून राजापूर आणि संगमेश्वर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हे चार संशयित हॉटेल फुडलँड येथे रूम पाहण्याच्या बहाण्याने आले होते. त्यानंतर त्यांनी हॉटेलचे ग्राहक नोंदणी रजिस्टर घेऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, संगमेश्वर येथेही याच आरोपींनी अशाच प्रकारे एका हॉटेलमधून ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी करून पलायन केले. ही बाब लक्षात येताच संबंधित हॉटेल मालकाने संगमेश्वर पोलिसांशी संपर्क साधला.

यानंतर संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तत्काळ नाकाबंदीचे आदेश दिले. पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी वापरलेली निळ्या रंगाची हुंडाई कार (क्र. केओ ५१ एमजी ६९०५) संगमेश्वर तालुक्यातील तुरळे परिसरात महामार्गावर सोडून पलायन केले.

सावर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी तत्काळ ही गाडी ताब्यात घेतली. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पाच मोबाईल फोन आणि आंबोली, सावंतवाडी, कणकवली तसेच संगमेश्वर येथील हॉटेल ग्राहक नोंदणी रजिस्टर आढळून आली. विशेष म्हणजे राजापुरातील हॉटेल फुडलँडचे रजिस्टर आरोपींनी महामार्गालगत फेकून दिले होते. तेही पोलिसांनी जप्त केले आहे.

या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी संगमेश्वर व सावर्डा पोलिसांशी समन्वय साधत गाडी आणि त्यातील साहित्य ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून ते लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आरोपींनी वापरलेली गाडी कर्नाटक राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. देवनगर, यल्लापूरा, मदापूरा, हारवान हल्ली, तालुका देवंगडी या पत्त्यावर गाडीची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गाडीशी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित फोन बंद असल्याचे आढळले.

हॉटेलमध्ये प्रवेश करून चोरी करणे तसेच ग्राहक नोंदणी रजिस्टर लांबविण्यामागे आरोपींचा नेमका हेतू काय होता, याचा सखोल तपास राजापूर आणि संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!