नाणार बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द; जनतेच्या एकजुटीचा विजय
प्रकल्प पूर्णपणे रद्द होईपर्यंत लढा कायम

राजापूर : तालुक्यातील नाणार, कुंभवडे व सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार व शिवसैनिकांनी उभारलेल्या तीव्र जनआक्रोशाची अखेर शासनाला दखल घ्यावी लागली असून, प्रस्तावित जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे स्थानिक जनतेच्या एकजुटीचा आणि कोकणप्रेमी जनतेच्या संघर्षाचा मोठा विजय आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी, बागायतदार व प्रशासनाच्या बैठकीत जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजापूरच्या वतीने पालकमंत्री सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
कोकणच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असताना तो प्रकल्प लादण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, ही भूमिका आज पुन्हा अधोरेखित झाली आहे. यापूर्वी रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांनी उभारलेल्या ऐतिहासिक लढ्यामुळेच तो विनाशकारी प्रकल्प मागे घेण्यास शासनाला भाग पाडले गेले होते. त्याच धर्तीवर या बॉक्साईट प्रकल्पाविरोधातही जनतेने एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने यापूर्वीच स्पष्ट इशारा दिला होता की, २० मे रोजीची जनसुनावणी रद्द करण्यात आली नाही तर स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या सहभागातून ती उधळून लावण्यात येईल. शिवसेना नेते तथा सचिव मा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस व तालुका प्रमुख कमलाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली या अन्यायकारक प्रकल्पाविरोधात व्यापक व तीव्र जनआंदोलन उभारण्याचा ठाम इशारा देण्यात आला होता. स्थानिक जनतेच्या तीव्र विरोधामुळे अखेर प्रशासनाला जनभावनेचा आदर करावा लागला.
तथापि, केवळ जनसुनावणी रद्द होणे पुरेसे नसून, प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्प संपूर्णपणे रद्द करण्यात यावा, ही आमची ठाम भूमिका कायम आहे. कोकणच्या निसर्गाचा, बागायतींचा, जलस्रोतांचा व स्थानिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार व शिवसैनिकांच्या सहभागातून हा लढा प्रकल्प पूर्णपणे रद्द होईपर्यंत कायम ठेवण्यात येईल, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजापूरच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.



