मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर नगरपालिकेची नालेसफाई मोहीम

राजापूर : लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती आणि समस्या टाळण्यासाठी राजापूर नगरपालिकेकडून शहरातील गटारे, नाले आणि वहाळ्यांच्या साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गाळ आणि कचरा साचल्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबून भरून ते पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याच समस्येवर उपाय म्हणून पालिकेने आतापासूनच साफसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे.

डोंगराळ भौगोलिक रचना असलेल्या राजापूर शहरात अनेक भागांत गटारे आणि वहाळ आहेत. पावसाच्या सुरुवातीला पाण्यासोबत वाहून येणारा कचरा, प्लास्टिक आणि गाळ यामुळे ही गटारे बंद होतात. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून वाहतुकीवर परिणाम होतो. तसेच गटारांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन रोगराई पसरण्याची शक्यताही वाढते.

दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्यांपासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबवत शहरातील गटारे आणि वहाळ्यांची व्यापक साफसफाई सुरू केली आहे. पालिकेचे कर्मचारी विविध भागांत जाऊन गाळ आणि कचरा काढण्याचे काम करत आहेत.

यासोबतच पाणीटंचाईच्या काळात शहरवासीयांना स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी शहरातील विहिरी तसेच तळ्यांमधील गाळ काढण्याचे कामही करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!