एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा शिवसेना मुख्यनेते पदी निवड; राजाभाई केणी यांच्याकडून अभिनंदन

अलिबाग (राजेश बाष्टे) : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले नेते एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत सर्वानुमते ही निवड झाली असून, राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी एकनाथ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “एकनाथ शिंदे साहेब हे संघर्षशील, दूरदृष्टी असलेले आणि जनतेच्या हितासाठी सतत काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने नवसंजीवनी घेतली असून, आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल.”
राजाभाई केणी यांनी पुढे म्हटले की, “शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नसून, ती सामान्य जनतेच्या भावना, अधिकार आणि सन्मानाचे प्रतीक आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व ही या लढ्याला दिशा देणारी शक्ती आहे.”
या निवडीमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष नव्या उमेदीने कार्यरत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


