सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?

मुंबई : दोन दिवसांपूर्वी झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुणाला मिळणार याबाबतच्या चर्चांना आता उधाण आले असतानाच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाल्या असल्याचे समजत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शनिवारी दुपारी बैठक होणार असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातून बाहेर येण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद सुनित्रा पवार यांनी स्वीकारावे अशी मागणी करण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुखपदही त्यांच्याकडेच राहावे यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते.



