अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना डिजिटल प्रमाणपत्रासाठी नव्याने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : जुलै २०१७ पूर्वी ज्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांनी ऑफलाईन पद्धतीने दर्जा प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा सर्व संस्थांनी डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी “आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नव्याने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी दिली आहे.
राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना भारतीय संविधानातील अनुच्छेद ३०(१) अन्वये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून डिजिटल स्वाक्षरी असलेले धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात येत आहे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.



