मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जामदा प्रकल्पग्रस्तांचे तीव्र आंदोलन

प्रशासनाच्या भूमिकेमुळे काजिर्डा परिसरात तणाव :आंदोलन चिघळण्याची शक्यता

राजापूर : तालुक्यातील काजिर्डा-जामदा परिसरात प्रस्तावित जामदा प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. प्रशासनाकडून आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली जात असल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी काल (२६ मे) रोजी सकाळी १० वाजल्यापासून काजिर्डा-राणेवाडी मार्गावर तीव्र आंदोलन छेडले आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली असून परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यासंदर्भात जामदा प्रकल्प संघर्ष समिती काजिर्डा-राणेवाडीच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना आधीच निवेदने सादर करण्यात आली होती.

तहसीलदार राजापूर यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जामदा प्रकल्पासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने जाहीर केलेल्या १०० टक्के पुनर्वसन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पासंदर्भात मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अनेक बैठका व ग्रामसभांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या निकषांनुसार योग्य निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यातच काही अधिकाऱ्यांकडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत २६ मे रोजी उपोषण आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनाने आंदोलनस्थळी पोलीस यंत्रणा तैनात केली खरी, मात्र तिथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. ‘आधी पूर्ण पुनर्वसन, मगच धरण’ या आंदोलकांच्या मुख्य मागणीकडे पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बाजूला सारून, आंदोलनकर्त्यांचे म्हणणे न जुमानता अधिकारी वर्गाने हाताच्या बोटावर मोजणाऱ्या फुटीरवाद्यांना साथ दिली. आंदोलनकर्त्यांच्या गर्दीमधून पोलीस गाडीचा वापर करून अन्य गाड्या गावामध्ये मोजणीसाठी जबरदस्तीने घेऊन गेल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत.

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे हे आंदोलन आता अधिक चिघळण्याच्या मार्गावर आहे. आमच्या मागण्या जर तातडीने पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही जामदा प्रकल्पग्रस्त एवढ्या भर थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाला देण्यात आलेल्या या निवेदनाच्या प्रती अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक आमदार किरण सामंत यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या आंदोलनात माजी सरपंच चंद्रकांत शिंदे, नितीन काजारे, पिंट्या आर्डे, पिंट्या गुरव, मंगेश नारकर, चंद्रकांत सावंत, कृष्णा आर्डे, प्रदिप चंदूरकर, दिपक पालकर, बारक्या मांडवकर, तुकाराम नारकर, विनोद आर्डे, गोपाळ पालकर यांच्यासह गावातील महिला वर्ग आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!