डंपरची रिक्षाला धडक; एकाचा जागीच मृत्यू, रिक्षाचालक गंभीर जखमी

खेड : तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर आज (३० मे) सायंकाळी भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलारे आयणी येथील संतोष भिलारे हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच-०८-एक्यू-८७८४) घेऊन भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते. रिक्षा आठवडा बाजार परिसरात पोहोचली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षाचालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून ती व्यक्ती रिक्षामध्ये प्रवास करत होती की रिक्षात बसण्यासाठी हात दाखवत असताना अपघाताची शिकार झाली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा आणि खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.
दरम्यान, या अपघातामुळे भरणे-खेड मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघाताचे नेमके कारण, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम आणि अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.



