कोतळूक उदमेवाडी येथील ग्रामस्थांनी जपलेय भजन, पारंपरिक संगीत आणि जाखडी नृत्याची १०० वर्षांची परंपरा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील उदमेवाडीतील ग्रामस्थांनी गणपती सणामध्ये पिढ्या-पिढ्या पारंपरिक संगीत आणि जाखडी नृत्याची १०० वर्षांची परंपरा आजही कायम राखली आहे. गणपतीचे आगमन झाल्यानंतर दररोज वेगवेगळ्या ६ ते ७ घरांमध्ये या पारंपरिक संगीत नाचाबरोबर ढोलकी वरचा नाच सुद्धा करत आहेत.
उदमेवाडी येथे ब्राह्मण, भंडारी, मराठा, तेली, सोनार, नाभिक, परीट, कुणबी, सुतार, वाणी ज्ञातीमधील बांधव अनेक पिढ्या एकत्रितपणे गेली कित्येक वर्षांपासून आजही प्रत्येकाच्या सुख-दुःखाच्या प्रसंगात संघटितपणे कामकाज करत आहेत. वेगवेगळे उद्योग करणारे उदिम म्हणूनच या वाडीचे “उदमेवादी” हे नाव झाले असून हे नाव आजही त्याच डौलाने नावारूपास येत आहे. सार्वजनिक ठिकाण म्हणून या वाडीचे श्रद्धास्थान असलेले श्री हनुमंताचे मंदिर असून अनेक वर्षांपासून हनुमंताचा जन्मोत्सव दोन दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो.
(कै.) पांडुरंग चव्हाण, दत्तात्रय ओक यांनी अनेक वर्ष या वाडीचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर सुरेश आरेकर, दिलीप मोहिते, अनंत चव्हाण यांनी या वाडीच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून सध्या समीर ओक वाडीच्या अध्यक्षपदाची धुरा सर्वांच्या सहकार्याने सांभाळत आहेत. श्री हनुमंताचा जन्मोत्सव, गोकुळाष्टमी, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, शिमगा उत्सव असे सार्वजनिक कार्यक्रम आनंदाने साजरे केले जातात. या वाडीमध्ये सध्या ५२ घरे ६० कुटुंब असून कामानिमित्त काहीजण मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी वास्तव्यास असतात; मात्र श्री हनुमंताचा जन्मोत्सव, शिमगोत्सव, गणपती सणामध्ये हे सर्वजण गावी येतात. गणपती सणामध्ये येथील ग्रामस्थांनी पिढ्या-पिढ्या पारंपरिक संगीत व जाखडी नृत्याची १०० वर्षांची परंपरा आजही कायम राखली आहे.
गणपतीचे आगमन झाल्यानंतर दररोज वेगवेगळ्या ६ ते ७ घरांमध्ये या पारंपरिक संगीत नाचाबरोबर ढोलकी वरचा नाच सुद्धा करत आहेत.
पारंपरिक संगीत व जाखडी नाचाची परंपरा अखंडित ठेवण्यामध्ये गायक बुवा म्हणून (कै.) आत्माराम चव्हाण, (कै.) काशिनाथ महाडिक, (कै.) पांडुरंग महाडिक, (कै.) दत्तात्रय महाडिक, बापू महाडिक तसेच गायक आणि वादन (कै.) राजाराम चव्हाण, वसंत महाडिक, वसंत सकपाळ यांचा मोठा सहभाग असून गायक म्हणून सध्या ही कला अनंत चव्हाण जोपासत आहेत.
या नृत्यामध्ये जी गाणी असतात ती चढत्या आवाजात विविध चालीत गायली जातात. महाभारत, रामायणातील अनेक विषय या गाण्यांमध्ये असतात. या संगीत व जाखडी नृत्यामध्ये गायनाबरोबर वादन व नाचणारे मंडळी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. हे वादन (कै.) शिवाजी चव्हाण, (कै.) दत्ताराम आरेकर, सुशील भाऊ चव्हाण यांनी करत आता हा वारसा अनिल चव्हाण, सुधीर झुंबर चालवित आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने नृत्य होण्यासाठी त्या काळात (कै.) पांडुरंग आरेकर हे काठी घेऊन लक्ष ठेवून असायचे एखादा कोणी चुकला किंवा योग्य पद्धतीने नाच करत नसेल किंवा नवीन पिढीतील कोणी नाचायला टंगळमंगळ करत असेल तर त्याला शिस्त शिकवण्याचे काम त्यांची काठी करत होती. या नाचाची परंपरा अखंडित ठेवण्यामध्ये उल्लेखलेल्या ग्रामस्थ तसेच अनेकांचा सहभाग आहे.
गणेशोत्सवात संध्याकाळी एकमेकांकडे आरतीसाठी जाण्याबरोबर एखाद्याच्या घरी वर्षभरात केव्हाही काही धार्मिक कार्यक्रम असल्यास तशी यजमानांची इच्छा असेल त्यानुसार वाडीचे “हनुमान प्रसादिक भजन मंडळाचे वारकरी” किंवा “संगीत भजन” संगीत भजन सेवेतही मोठ्या उत्साहात मंडळी सामील होत असतात. अलीकडच्या काळात सुधीर झिंबर, अनंत चव्हाण, सचिन ओक हे भजनाचा वारसा समर्थपणे सांभाळत आहेत. त्याशिवाय वाडीच्या अंजनी माता महिला भजन मंडळामध्ये सौ.bवंदना झिंबर आणि अनुजा चव्हाण या गायक बाजू सांभाळत भजनी कला सादर करीत असतात.
असा सांस्कृतिक धार्मिक पारंपरिक ठेवा आजही अखंडपणे गुहागर तालुक्यातील कोतळूक गावच्या १० समाज एकत्र असलेल्या उदमेवाडी येथील ग्रामस्थांनी जपला आहे.



