खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात साकारतोय “फुलांचा मळा”
आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून विद्यार्थ्यी फुलवतात फुलशेती

आबलोली : चिपळूण तालुक्यातील खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयामधील प्रक्षेत्रावर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून विविध फुलांची लागवड करण्यात आली आहे. अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी झेंडू, अस्टर, गुलछडी आदी फुलांची लागवड करण्यात केली आहे.

कृषी क्षेत्रामध्ये इतर पिकांपासोबतच फुलशेतीचे ही अनन्य साधारण महत्त्व आहे. कोकणामध्ये फुलशेती तशी दुर्मिळच. कोकणातील हवामान हे या शेतीसाठी पोषक असून, योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास यामधूनही भरघोस उत्पादन घेता येऊ शकते व फुलशेती हा एक सक्षम व्यवसाय होऊ शकतो हा दृष्टीकोन समोर ठेवून या विद्यार्थ्यांकडून पिवळा व भगवा झेंडू, अस्टर व गुलछडी आदींची लागवड करण्यात आली. सुमारे १० गुंठे क्षेत्रावर ६०×६० से.मी अंतरावर व १६ वाफयांमध्ये ‘ड्रीम यलो’ व ‘कलकत्ता जंबो’ या जातीच्या झेंडूची लागवड करण्यात आली आहे. तसेच ३ गुंठे क्षेत्रावर ६ वाफ्यांमधये अस्टरची व सुमारे २ गुंठे क्षेत्रावर गुलछडीची लागवड करण्यात आली आहे.

या सर्व फुलांसाठी विद्यार्थ्यांकडून उत्तम खतांचे व आवश्यक मूलद्रव्ये यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामध्ये १९:१९:१९ हे रोपांच्या वाढीसाढी, ह्युमिक ॲसिड हे रोपांच्या मुळांच्या वाढीसाठी, १३:४०:१३ हे कळ्यांच्या वाढीसाठी व १३:००:४५ हे मूलद्रव्य फुलांचे वजन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून देण्यात आले आहे. या मधून आतापर्यंत या विद्यार्थ्यांना सुमारे ७०० किलो झेंडू, ७० किलो अस्टर व ३० किलो गुलछडीचे उत्पादन मिळाले आहे. नुकत्याच होत असलेल्या शिमगोत्सव सणासाठी पंचक्रोशीतील सर्व गावांमधून या विद्यार्थ्यांच्या फुलांना प्रचंड मागणी आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून बनवण्यात येणारे फुलांचे हार व गुच्छ यांनीही मागणी वाढत आहे.

आतापर्यंत या विद्यार्थ्यांकडून दोन महिन्याच्या कालावधीत मध्ये ३९० फुलहार विकण्यात आले आहेत. तसेच सावर्डे आठवडी बाजारातही या फुलांना उत्तम मागणी आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रक्षेत्रावर भेट दिली व या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, उद्यानविद्या विभाग प्रमुख प्रा. स्मिता जाधव व प्रकल्प अधिकारी प्रा. अंकिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



