कारच्या ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाची ॲम्ब्युलन्सला धडक
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबाहेरील घटना

रत्नागिरी : शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शनिवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडता-घडता टळली. एका कार चालकाने केलेल्या बेजबाबदार ओव्हरटेकच्या प्रयत्नामुळे रिक्षाचे नियंत्रण सुटून ती रुग्णवाहिकेवर जाऊन आदळली.
जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ होती. याच दरम्यान, एका कार चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.अचानक समोर आलेल्या कारमुळे रिक्षाचालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित रिक्षा रुग्णालय परिसरात पार्क केलेल्या रुग्णवाहिका (एम एच०८- एपी -३००३) जाऊन धडकली.
ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाच्या समोरील भागाचा आणि काचेचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात रिक्षाचालक आणि एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, ही घटना रुग्णालयासमोरच घडल्यामुळे जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळणे सोपे झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत पुढील तपासाला सुरुवात केली; मात्र रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत.



