मुख्य बातमी

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे कृषी शास्त्र परिभाषा कोश उपसमिती बैठक

रत्नागिरी : राज्य शासनाच्या भाषा संचालनालय अंतर्गत विविध विषयांवरील परिभाषा कोश निर्मितीचे कार्य सुरू असून कृषी शास्त्रातील परिभाषा कोश सुधारित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कार्य करण्यासाठी तज्ज्ञ समिती राज्य शासनाने नेमली असून त्याचे कार्य प्रत्यक्ष बैठकीमधून चर्चा करून होत असते. कृषी शास्त्र परिभाषा कोश उपसमितीची ९१ वी सभा रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे सुरू असून त्यात मराठीतील नवनवीन संज्ञा तयार करण्याचे कार्य सुरू आहे. कृषीशास्त्र परिभाषा उपसमितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव उल्मेक यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कार्य सुरू असून यासाठी मराठी भाषा संचालनालयाचे भाषा संचालक, उपसंचालक आणि कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्य सुरू आहे.

मराठी ही अभिजात भाषा आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाकरता शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असतात. आज प्रयत्नातला एक भाग म्हणजे विविध विषयातील परिभाषा कोश तयार करणे.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. शेतकरी, शेतमजूर, शेतकरी महिला हे दैनंदिन रित्या त्यांचे सर्व व्यवहार मराठी मधूनच करत असतात. रोज नवीन नवीन शोध, तंत्रज्ञान निर्मिती सुद्धा या कृषी शास्त्रामध्ये होत असते. हे सर्व शोध आणि तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरता त्यांच्या बोली भाषेत तसेच मातृभाषेतून त्यांना कळावे त्याचं ज्ञान प्राप्त व्हावे त्यातून कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी मराठीतून उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. बऱ्याचदा असे संशोधन आधारित ज्ञान इंग्रजीमध्ये उपलब्ध असते. ते मराठीतून उपलब्ध होण्याकरता त्या विषयातील परिभाषा कोश उपलब्ध असणे महत्त्वाचे असते.

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन कृषी शास्त्र परिभाषा कोश समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव उल्मेक आणि भाषा संचालक अरुण गीते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीसाठी कृषीशास्त्र परिभाषा कोश समितीचे सदस्य उपस्थित असून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या प्रा. श्रीमती स्नेहा शिवलकर यांना आमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!