मुख्य बातमीराजकारण

आर्थिक अडचणींत असलेल्या कोकणातील जिल्हा सहकारी बोर्डांना बंद असलेला ‘शिक्षण निधी’ मिळवून दिला जाईल

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचे आश्वासन

रत्नागिरी : आर्थिक अडचणींमुळे बिकट परिस्थितीत असलेल्या कोकणातील जिल्हा सहकारी बोर्डांना पुन्हा सक्षम करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बंद असलेला ‘शिक्षण निधी’ मिळवून दिला जाईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. त्यांच्या या घोषणेमुळे कोकणातील सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हा सहकारी बोर्डांच्या सक्षमीकरणासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी काल (सोमवारी) रत्नागिरीतील एमआयडीसी विश्रामगृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजु यांच्या पुढाकाराने स्वतः आमदार प्रवीण दरेकर यांनी ही बैठक बोलावली होती. या ऐतिहासिक बैठकीमुळे जिल्हा संघांना पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

बैठकीच्या प्रारंभी, आमदार प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या वतीने बोर्डाचे माजी अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर झालेल्या चर्चेत, तिन्ही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. “सध्या जिल्हा बोर्डांना कोणत्याही स्वरूपात शिक्षण निधी मिळत नाही. केवळ शिक्षण आणि प्रशिक्षणावर अवलंबून असलेल्या या संस्था निधीअभावी अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहेत,” असे मत सर्वच अध्यक्षांनी एकमुखाने मांडले. राज्य संघाने जिल्हा संघाची थकीत रक्कम लवकरात लवकर द्यावी, अशी मागणीही यावेळी रत्नागिरी जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांनी केली.

सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर आमदार दरेकर यांनी जिल्हा बोर्डांना अनेक ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा बोर्डांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिक्षण निधी पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण मेळावे आयोजित करून आणि उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधून बोर्डांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाईल.

राज्य संघामार्फत सहकाराचे आधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी कोकणातून ५ तज्ज्ञ प्रशिक्षकांची नावे सुचवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लवकरच कोकण विभागासाठी एक भव्य ‘सहकार परिषद’ आयोजित केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

या बैठकीत कोकणात ‘सहकार भवन’ उभारण्याची मागणीही करण्यात आली, ज्यावर सकारात्मक विचार करण्याचे दरेकर यांनी सूचित केले. तसेच, १४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान होणारा सहकार सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रायोजक शोधण्याचे आणि त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी (डीडीआर) सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. इतिहासात प्रथमच झालेल्या या बैठकीमुळे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघ पुन्हा सक्षम होतील, असा विश्वास सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!