कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यात विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील महत्त्व सोप्या शब्दात पटवून दिले. शारीरिक विकास आणि मानसिक शांततेसाठी दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व्हिडिओद्वारे दाखविण्यात आले.
शरीराची लवचिकता, एकाग्रता वाढवण्यासाठी पद्मासन, वज्रासन आणि ताडासन ही आसने विद्यार्थ्यांकडून करून घेतली. शरीरातील ऊर्जा आणि स्फूर्ती वाढवण्यासाठी सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. शेवटी मनाच्या एकाग्रतेसाठी आणि तणाव मुक्तीसाठी प्राणायाम आणि शांत ध्यानधारणा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांनी विद्यार्थ्यांना केवळ एकच दिवसापुरता योग न करता दररोज १५ ते २० मिनिटे योग अभ्यास करून आपली जीवनशैली आरोग्यदायी बनवावी असे सांगितले. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुट्टीचा दिवस असूनदेखील योगासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांना धन्यवाद देण्यात आले.
योग दिन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल गार्डी, प्रवीण मोरे, छोटीराम सूर्यवंशी, अमित वेदरे, मनोज घाणेकर, नेहा राजेशिर्के, श्रेया मांडवकर आणि शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री वाडेकर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच प्रज्ञा सुर्वे, नेहा गुळेकर, शर्वरी वाडेकर, मनस्वी सनगरे, उज्ज्वला पेजे, स्वाती साळवी, श्रुती मोहिते यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन हा कार्यक्रम अधिक उत्साहवर्धक होण्यासाठी मदत केली.



