मुख्य बातमी

राधिका पेडणेकर हिचे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोल्हापूर येथे योगासनांचे सादरीकरण

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी कोल्हापूर येथे योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (कोल्हापूर), सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुष विभाग, राष्ट्रीय आयुष मिशन, जिल्हा शल्य चिकित्सक, माय भारत आणि केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय (महाराष्ट्र-गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी राधिका मंदार पेडणेकर हिला निमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमातील मुख्य सत्रादरम्यान राधिका हिने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांसमोर अत्यंत प्रभावी व कौशल्याने योगासनांचे सादरीकरण केले. तिने सादर केलेली अवघड आसने, तिची शारीरिक लवचिकता, कमालीची एकाग्रता आणि श्वासोच्छवासावरील नियंत्रण यामुळे तिचे सादरीकरण उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

समाजातील सर्व घटकांमध्ये, विशेषतः युवा पिढीमध्ये योगाविषयी आणि आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा या संयुक्त उपक्रमाचा मुख्य हेतू होता. एवढ्या मोठ्या शासकीय व्यासपीठावर राधिकाने दाखवलेला दांडगा आत्मविश्वास आणि तिचे उत्कृष्ट योगासन कौशल्य पाहून जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, क्रीडा व आरोग्य विभागाचे पदाधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे जाहीर कौतुक केले.

राधिकाच्या या यशस्वी आणि गौरवपूर्ण सादरीकरणामुळे ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल विद्यालयाचे गुरुकुलप्रमुख किरण सनगरे व शिक्षक वर्ग यांनी राधिकाचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!