संस्कृत सप्ताहानिमित्त रत्नागिरीत चार स्पर्धांचे आयोजन; विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

रत्नागिरी : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांच्या विस्तारसेवा मंडळाच्या वतीने आणि भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत सप्ताहाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ. पां. वा. काणे रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, तिसरा मजला, बस स्टँड समोर, रत्नागिरी येथे होणार आहे.
स्पर्धांची माहिती अशी : प्रश्नमंजूषा स्पर्धा – ही स्पर्धा दुपारी २ ते ३ यावेळेत होणार असून, स्पर्धेसाठी रामायण, महाभारत, पुराणे, इतिहास व सामान्य ज्ञान हे विषय असणार आहेत. ही स्पर्धा शालेय गट (इयत्ता पाचवी ते नववी) आणि खुला अशा दोन गटांत होणार आहे. प्रत्येक शाळेतून ४ विद्यार्थी आणि एक शिक्षक असा ५ जणांचा एक संघ सहभागी होऊ शकतो.
गीता १५वा अध्याय मुखोद्गत स्पर्धा – दुपारी ३ ते सायंकाळी ४ यावेळेत शालेय आणि खुल्या अशा दोन गटांत होणार आहे. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा १५वा अध्याय मुखोद्गत करून स्पष्ट आणि शुद्ध उच्चारात सादर करावा.
संस्कृतगीतगायन स्पर्धा – ही स्पर्धा सायंकाळी ४ ते ५ यावेळेत शालेय आणि खुल्या गटात होणार आहे. संस्कृत भाषेतील गीत ३ ते ५ मिनिटांच्या कालावधीत स्वर-तालबद्ध, स्पष्ट आणि सुगम पद्धतीने गावे.
स्तोत्रपठन स्पर्धा – ही स्पर्धा सायंकाळी ४ ते ५ यावेळेत खुला गट आणि विद्यार्थी गट अशा दोन गटांत होईल. स्पर्धेसाठी “महागणेशपञ्चरत्नस्तोत्र” तोंडपाठ असणे बंधनकारक आहे. स्तोत्र ३ ते ५ मिनिटात स्पष्ट, अस्खलित म्हणावे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व स्पर्धांसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. संस्कृत भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार व्हावा हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे.
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 8390854926, 7219054097 या क्रमांकावर संपर्क साधावा.



