मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुंबई-गोवा महामार्गावर दाभीळनजीक ठेकेदाराचा अजब कारभार

भर पावसात गर्डर बसवण्याची लगबग : वाहतुकीचा तासभर खोळंबा, प्रवासी हैराण 

खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दाभीळजवळील पुलावर आज (२३ जून) दुपारच्या सुमारास पुलावर गर्डर टाकण्याचे काम अचानक सुरू करण्यात आले; मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू केलेल्या या कामाचा फटका हजारो वाहनचालकांना बसला. या कामामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास पूर्णपणे रोखून धरली. यामुळे भर पावसात महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

तालुक्यातील दाभीळनजीक पुलाचे काम सुरू आहे. आज दुपारच्या सुमारास दाभीळ जवळील पुलावर गर्डर टाकण्याचे काम अचानक सुरू करण्यात आले. यासाठी वाहतूक वळवण्याबाबत किंवा ती थांबवण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना आधी देण्यात आली नव्हती. त्यातच मुसळधार पाऊस सुरू असल्याने अचानक थांबवलेल्या वाहतुकीमुळे नेमके काय झाले आहे, याबाबत अनेक वाहनचालक आणि प्रवासी प्रचंड संभ्रमात पडले होते.

तब्बल एक तास महामार्ग रोखल्यामुळे काही मिनिटांतच वाहनांची संख्या वाढली आणि बघता बघता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पावसामुळे गाड्यांमधून खाली उतरणेही प्रवाशांना कठीण झाले होते. एसटी‌ बसेस, खासगी वाहने आणि मालवाहू ट्रक या कोंडीत अडकून पडल्याने लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

तब्बल एका तासानंतर गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक संथ गतीने पूर्ववत करण्यात आली. मात्र, ऐन पावसाळ्यात अशा प्रकारे निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांवर वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, एकीकडे ठेकेदाराने महामार्ग रोखून धरला असताना, दुसरीकडे वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलिसांची भूमिका मात्र अत्यंत उदासीनतेची होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी केवळ ‘बघ्याची भूमिका’ घेतल्याचा आरोप संतप्त वाहनचालकांनी केला आहे. ठेकेदाराला अशा प्रकारे महामार्ग रोखण्याची परवानगी दिली कोणी, आणि पोलीस यंत्रणा ठेकेदाराच्या या मनमानीपुढे हतबल का झाली होती, असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत.

आधीच पावसाळ्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. त्यात कोणतीही सूचना न देता तासभर हायवे जाम करून ठेवला. पोलिसांनी ठेकेदाराला जाब विचारण्याऐवजी ते शांत उभे होते. प्रशासनाचा कसलाच ताळमेळ नाही.” या संदर्भात माहिती घेऊन प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी येथे उपस्थित वाहनचालक समीर डोईफोडे (रा. ठाणे) यांनी दिली.

अशा पद्धतीने वाहतूक रोखून धरताना काम ज्या ठिकाणी सुरू आहे तिथपासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर ती बॅरिकेटिंग करणे गरजेचे आहे, तशी सूचना देणे हे देखील गरजेचे आहे. या त्रुटी त्या ठिकाणी असतील, तर तशा सूचना संबंधित ठेकेदाराला आम्ही देऊ, असे महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!