आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

रत्नागिरीतील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन

रत्नागिरी : कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्थेच्या वतीने आंबा बागायतदार संघटनेचे नेते बावा साळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत रत्नागिरी दौऱ्यावर असलेले रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

“कोकणातील आंबा, काजू, मच्छी, नारळ, सुपारी, मसाल्याचे पदार्थ, हळद, कोकम आदी पिके शेतकऱ्याला प्रचंड मेहनत करून, जीवावर उदार होऊन शेतीचे उत्पादन घ्यावे लागते तरी उत्पादित मालाला योग्य प्रकारे बाजारपेठ आणि हमीभाव मिळावा”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे शेती व्यवसाय असणाऱ्या कोकण पट्टयात मानवी वस्तीला आणि शेतीला विनाशकारी तसेच प्रदूषणकारी उद्योग व कारखाने कोकणात कोकणात होऊ घातलेले देवगड, जैतापूर, बारस, पूर्णगड, वाटद आदी भागात रासायनिक प्रकल्प आणू नयेत. त्याऐवजी पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, कृषीसंवर्धन, आणि कृषी पर्यटन आदी व्यवसायाला चालना देणारे उद्योग व्यवसाय आणावेत. कोकणात आंबा, काजू आदी पिकांवर संशोधन केंद्रे उभारण्यात यावीत.

आंबा, काजू नुकसान भरपाईचा लाभ देताना ई-पीक पाहणी किंवा फार्मर आयडी या गोष्टी विचारात घेऊ नये. पिक विमाचे निकष हे कोकणातील शेतीला अजिबात योग्य नाहीत, तरी सरकारने हे निकष बदलून कोणत्यातरी कंपनीला कंत्राट देऊन पिक विमा योजना राबवणे ऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट विम्याची रक्कम जमा करावी. शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांना प्रति झाड पाच हजार रुपये एवढी रक्कम देण्याचे आदेश करावेत. सर्व बँकांना समान नियम लागू करावेत आणि व्याज अनुदान लाख रुपये रक्कम वाढवून मिळावी, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

विविध प्रश्नांवर कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्था रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ, पावस परिसर आंबा उत्पादक संस्थेच्या वतीने बावा साळवी यांनी खासदार नारायण राणे यांना निवेदन सादर केले. यावेळी आंबा, काजू बागायतदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!