पटवर्धन हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराजांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी : येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये आज (२६ जून) लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची १५२ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, दिनविशेष विभाग प्रमुख श्रीमती गाडगीळ तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री. पंगेरकर यांनी केले. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणप्रेम, सामाजिक न्याय, समता, बहुजन कल्याण आणि लोकाभिमुख प्रशासन याविषयी मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रभावी मनोगते व्यक्त केली. वेदा शिंदे हिने शाहू महाराजांचे थोर समाजसुधारक व पुरोगामी विचारांचे नेतृत्व स्पष्ट केले. नित्या फणसे हिने अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांच्या लोकहितवादी धोरणांचा आढावा घेतला. सलोनी कुदळे हिने शेती, उद्योग आणि आर्थिक विकासासाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. स्वरा पनोरकर हिनेही शाहू महाराजांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विदुला मुळये हिने समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या जपणुकीत शाहू महाराजांचे योगदान प्रभावीपणे मांडले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांनी सर्वांना राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीच्या शुभेच्छा देत, सामाजिक न्याय, सर्वसमावेशक शिक्षण, मागासवर्गीयांसाठी आरक्षण, स्त्रीशिक्षणाचा प्रसार आणि सर्वधर्मसमभाव या त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रिया वांदरकर हिने केले, तर पर्यवेक्षक श्री. लवंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षणाला चालना, शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय आणि सामाजिक समतेची मूल्ये रुजवून आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत अर्थपूर्ण ठरला.



