रत्नागिरी शहरातील धोकादायक विद्युत खांब बदलण्यास महावितरणकडून सुरुवात

रत्नागिरी : शहरातील सर्व विद्युत खांबांची तातडीने पाहणी करून जे खांब धोकादायक अवस्थेत आहेत, ते त्वरित बदलण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महावितरणने तातडीने शहरातील धोकादायक खांब बदलण्यास सुरुवात केली आहे.
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जिंदल यांनी महावितरणला हे निर्देश दिले आहेत. या निर्देशानंतर महावितरणकडून तातडीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील नाचणे रोडवरील पॉवर हाऊस परिसर, तसेच थिबा पॅलेस रोडवरील धोकादायक विद्युत खांब बदलण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. शहरातील सर्वच खांबांची तपासणी पूर्ण करून हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.



