जगबुडी-नारंगीचा रौद्रावतार
खेड बाजारपेठेत पुराचे पाणी : दापोली मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती जलमय

खेड : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खेड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. जगबुडी नदीने रविवारी सकाळी ११ वाजता धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर सायंकाळपर्यंत तिची पाणीपातळी ९.८० मीटर इतकी झाली. त्यानंतर नदीचे पाणी थेट खेड शहरातील बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी वर्गाची एकच धावपळ उडाली.
खेड शहरातील मटण-मच्छी मार्केट, तीनबत्ती नाका, वाल्की गल्ली, निवाचा चौक, पान गल्ली तसेच पोत्रिक मोहल्ला या भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक दुकानदारांना माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ करावी लागली. पावसाचा वेग अचानक वाढल्याने काही व्यापाऱ्यांना आपला माल बाहेर काढण्याचीही संधी मिळाली नाही.
पूरस्थिती गंभीर होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सकाळपासूनच तीन वेळा सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. नगरपरिषद, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दिवसभर सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या.
दरम्यान, नारंगी नदीलाही मोठा पूर आल्याने तिचे पाणी पात्राबाहेर आले. सुर्वे इंजिनिअरिंगजवळील नवीन मोरीवरून पाणी वाहू लागल्याने खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तसेच खेड-खाडीपट्टा आणि सुसेरी मार्गावरील काही पुलांवरूनही पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तात्पुरता तुटला.
नारंगी नदीच्या पुरामुळे परिसरातील हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीकाठावरील स्मशानभूमी, वीटभट्ट्या आणि सखल भागातील शेती पूर्णपणे जलमय झाली आहे.
पूराचा फटका वाहतुकीलाही बसला असून खेड आगाराच्या मुंबई-बोरिवलीसह ग्रामीण भागातील अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मुंबई-गोवा महामार्गावरही काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. खेड शहरातील खांबतळे झोपडपट्टीतील ४५ नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सम्राट अशोक नगर येथील बालवाडी इमारतीत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदी, ओढे-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकिनारी मासेमारी किंवा पर्यटनासाठी जाऊ नये, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने खेड तालुक्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जगबुडी आणि नारंगी नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.



