मुख्य बातमी

मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे लांजा नागरिक त्रस्त

ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. अतिशय संथ गतीने सुरू असलेले हे काम आणि नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे लांजा शहरासह परिसरातील नागरिकांची गैरसोय वाढली आहे. याबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लांजा शहर प्रमुख मोहन तोडकरी यांनी लांजा तहसीलदारांना लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या महामार्गावरील कामामुळे वाहनचालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः उड्डाणपुलांच्या उतारासाठी करण्यात येणारा भराव हा निकृष्ट दर्जाचा असून केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रकार सुरू आहे.

भरावाच्या दोन्ही बाजूंना लावण्यात येणाऱ्या इंटरलॉकिंग प्लेट्स बाहेर निघत असून त्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच भराव आणि कॉंक्रिट देखील खचून भेगा पडल्या आहेत. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे.

संबंधित प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे तोडकरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील ८ ते १० दिवसांमध्ये या समस्येबाबत योग्य तोडगा न निघाल्यास ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही लांजा तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!