जास्त पीक उत्पादनासाठी अचूक माती परीक्षण आवश्यक : डॉ. मकरंद साखळकर
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रयोगशाळेत माती परीक्षण

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा चालवली जाते. आतापर्यंत येथे शासनाकडून आलेल्या जवळपास ११ हजार मातीच्या नमुन्यांचे परीक्षण करून अहवाल देण्यात आला आहे. माती परीक्षणामुळे जमिनीची खतांची गरज व उत्पादन वाढीसाठी योग्य मार्गदर्शन मिळते. जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी अचूक माती परीक्षण, योग्य खत व्यवस्थापनाची गरज असते. त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या प्रयोगशाळेतून माती परीक्षण करून घ्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा चालवली जाते. २०१७ पासून माजी विभागप्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांच्या पुढाकाराने ही प्रयोगशाळा सुरू झाली. शासनाकडून येणाऱ्या मातीच्या नमुन्यांचे परीक्षण करून सॉईल हेल्थ कार्ड देण्याचे काम या प्रयोगशाळेमार्फत केले जाते. कोव्हीड काळात या कामात थोडासा खंड पडला. मात्र २०४ पासून परत एकदा ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने काम करत आहे.
यासंबंधी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या, या प्रयोगशाळेत मातीच्या एकूण १२ घटकांचे परीक्षण केले जाते. यामध्ये पीएच, ऑरगॅनिक कार्बन, एन. पी. के आणि मातीतील सुक्ष्म पोषक द्रव्ये एवढे घटक तपासले जातात. यासाठी लागणारे तज्ज्ञ मनुष्यबळ आणि आधुनिक उपकरणे प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत. या वर्षापासून या सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. मातीला नक्की कोणत्या खताची गरज आहे, हे समजून घेण्यासाठी आंबा, काजू बागायतदारांपासून भातशेती व अन्य सर्व प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे. पावसाळ्यात माती परीक्षण केले जात नाही. पावसाळ्यानंतर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
माती परीक्षणासाठी शेतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून माती घ्यावी. माती घेण्यापूर्वी वरचा कचरा, पाने, दगड बाजूला काढावेत. पिकासाठी साधारण १५ ते २० सेंमी खोलीपर्यंतची माती बाजूला काढावी. व्ही आकाराचा खड्डा करून मधल्या भागातील माती घ्यावी. सर्व माती अर्धा किलो नमुन्यासाठी स्वच्छ पिशवीत भरून द्यावी.
माती परीक्षण का आवश्यक
अनावश्यक खताचा खर्च टाळते. पीक उत्पादन वाढवते. मातीची सुपीकता सुधारते. दीर्घकालीन मातीचे आरोग्य टिकवून ठेवते. पर्यावरण संरक्षणास मदत करते. या परीक्षणात मातीची पीएच, विद्युत चालकता, सेंद्रिय कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, बोरॉन, लोह, जस्त, तांबे, मॅंगेनीज या घटकांची तपासणी के
ली जाते.



