ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची बांबू संशोधन केंद्राला शैक्षणिक भेट

राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील बांबू संशोधन केंद्र येथे रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशालेच्या ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट दिली. या भेटीतून विद्यार्थ्यांना शेती, निसर्ग आणि विविध पिकांविषयीचे मोलाचे ज्ञान मिळाले.
या क्षेत्रभेटीदरम्यान बांबू संशोधन केंद्राचे व्यवस्थापक वासुदेव घाग यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून बांबूची लागवड, त्याचे विविध प्रकार आणि शास्त्रशुद्ध व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय, रेशीम शेतीसाठी उपयुक्त तुतीची लागवड, फणस लागवड आणि परिसरातील विविध औषधी वनस्पतींची माहिती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेचे समाधान केले. निसर्ग संवर्धन आणि शाश्वत शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी यावेळी समजून घेतले.
अभ्यासात्मक क्षेत्रभेटीनंतर, पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी चुना-कोळवण येथील निसर्गरम्य ‘सवतकडा’ धबधब्याला भेट दिली. कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी धबधब्यात मनसोक्त भिजून वर्षासहलीचा मनमुराद आनंद लुटला.
या सहलीसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे आणि गुरुकुल प्रमुख किरण सनगरे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या उपक्रमामुळे अभ्यासासोबतच निसर्गाशी जवळीक साधण्याचा आगळावेगळा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.



