मुख्य बातमी

कोणतीही दुर्घटना होऊ नये याची पूर्वतयारी सर्व यत्रंणांनी करावी : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक 

रत्नागिरी : जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने आतापासूनच करावी. आपदा मित्रांची संख्या वाढवावी, अग्नीशामन दल, पोलीस, आरोग्य विभागांची रंगीत तालीम तालुकानिहाय घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, अधीक्षक अभियंता महावितरण सुनिलकुमार माने, अधीक्षक अभियंता सा. बा. विभाग मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जगदीश सुखदेवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी नदीतील गाळ काढणे, दरडप्रवण क्षेत्र, जिल्ह्यातील समुद्र, खाडी, नदी किनाऱ्यावरील गावे, पूरप्रवण, दरडप्रवण गावांची संख्या, तालुकानिहाय कारखाने, रासायनिक कारखाने, घाट, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, साकव, उपलब्ध शोध व बचाव साहित्य, गाव आपत्ती व्यवस्थापन कीट, फायर सूट, पोर्टेबल इन्फ्लॅटेबल एलईडी लाईट सिस्टीम, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, रोप आणि रेस्क्यू किट, पर्जन्यमापक यंत्र, होर्डिंग्ज, धरणे आदीबाबत आढावा घेतला.

ते म्हणाले, सध्या असणाऱ्या आपदा मित्रांशी संपर्क करुन त्यांना सतर्क करा. त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रंगीत तालीम घ्यावी. प्रत्येक विभागाने काय नियोजन केले आहे, पूर्वतयारी कशी केली आहे, याबाबतचा अहवाल द्यावा. प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आपल्या स्तरावर सर्व यत्रणांची बैठक घेऊन नियंत्रण कक्ष स्थापन करावे. मोठे बांधकाम, इमारती याचे ऑडिट करा. जलसंपदा विभागाने प्रत्यक्ष भेट देऊन धरणांबाबत ऑडिट करावे. आरोग्य विभागाने आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवावी. सर्व विभागाने आपल्याकडील साधनसामुग्री तपासून तयार ठेवावी. त्याचबरोबर उपलब्ध होणारी साधनसामुग्री त्याबाबतही यादी तयार ठेवावी. स्थलांतरण, निवारा याबाबतही नियोजन करावे. एनडीआरएफच्या दोन पथकांसाठी मागणीही करावी. साकव, पूल यांचेही ऑडिट करावे.

धोकादायक होर्डिंग्ज काढून टाकावेत. अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांनी सर्व प्रमुख घाटात मान्सून कालावधीपर्यंत जेसीबी, पोकलेन, डंपरची व्यवस्था कायमस्वरुपी करावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यात साथीचे रोगांचा प्रसार होवू नये म्हणून उपाययोजना करावी, अशा सूचना दिल्या.

नदीतील गाळ काढणे

वाशिष्टी नदी टप्पा १, टप्पा २, टप्पा ३ अशा तीन टप्प्यात ३० ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आज अखेर २० लक्ष ६१ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. चालू वर्षी १ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जगबुडी आणि नारंगी नदीतून देखील ५१ हजार ७९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. अर्जुना नदीमधून २२ हजार ९९७ घनमीटर तर कोदवली नदीमधून ७ हजार ५४० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी विभागनिहाय सविस्तर संगणकीय सादरीकरण करुन मान्सून पूर्व तयारी व आपत्ती निवारण याबाबतची माहिती दिली.

दूरदृश्यप्रणालीद्वारे क्षेत्रिय स्तरावरील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!