मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ओणी पंचक्रोशीतील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

लोकप्रतिनिधींची एमएसइबी अधिकाऱ्यांसमवेत बैठक : झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्याच्या सूचना

राजापूर : तालुक्यातील ओणी पंचक्रोशी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येची दखल घेत सोमवारी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन विविध उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसह वीजपुरवठा खंडित होणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी रत्नागिरी विभागाचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश करंबेलकर व राजापूर विभाग क्र. २ चे उपकार्यकारी अभियंता मंगेश शिरसागर यांची कार्यालयात भेट घेऊन परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे मान्यवरांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

बैठकीनंतर अधिकाऱ्यांसह वीजपुरवठा खंडित होणाऱ्या विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून परिसरातील नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रतीक शांताराम मटकर, पंचायत समिती सदस्य गौतम जाधव, चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मटकर, कळसवलीचे सरपंच तथा युवा सेना राजापूर उपतालुका प्रमुख देवेश तळेकर, उपसरपंच जयवंत शेडेकर, खरवतेचे सरपंच अभय चौगुले, वडदहसोळचे सरपंच विजय घाडये, मुबारक मालीम, विनय चव्हाण, चंद्रकांत शेवडे, संदेश शेवडे, नवनीत जाधव, पार्थ शेवडे आणि गौतम शेवडे उपस्थित होते.

परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा निर्धार उपस्थित लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!