रत्नागिरी जिल्हा बँकेच्या डिजिटल बँकिंगची मोठी झेप; वर्षभरात १,०१५ कोटींचे डिजिटल व्यवहार

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात डिजिटल बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्राहकांकडून तब्बल १,०१५ कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार नोंदविले आहेत. यापैकी युपीआयद्वारे ७९१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांनीही डिजिटल बँकिंगचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केल्याचे दिसून आले आहे.
ग्राहकांना सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने एटीएम, मोबाइल बँकिंग, युपीआय, आयएमपीएस, क्यूआर कोड आणि क्यूआर साउंड बॉक्स यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून सहज आर्थिक व्यवहार करता येत आहेत. ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी ग्राहक मेळावे, जनजागृती शिबिरे तसेच फिरत्या एटीएम व्हॅनद्वारे विशेष मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.
ग्राहकांच्या व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी एसएमएस अलर्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रत्येक व्यवहाराची तत्काळ माहिती मोबाईलवर मिळते. तसेच सायबर हल्ल्यांपासून संरक्षणासाठी २४x७ देखरेख व्यवस्था कार्यरत आहे.
चालू आर्थिक वर्षातील १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत मोबाइल बँकिंगद्वारे ३.०४ कोटी, युपीआयद्वारे २६८.१० कोटी, क्यूआर कोडद्वारे ८.२९ कोटी, आयएमपीएसद्वारे १७.३२ कोटी आणि एटीएमद्वारे ३४.०९ कोटी रुपयांचे व्यवहार नोंदविण्यात आले आहेत.
बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ७६ शाखांमार्फत ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. सध्या बँकेकडे १९ एटीएम केंद्रे आणि ३ फिरत्या एटीएम व्हॅन कार्यरत असून लवकरच एइपीएस सेवा सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात आणखी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यावर बँकेचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



