‘मागेल त्याला काजू’ योजनेअंतर्गत पावस येथे काजू रोपांचे वाटप; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : ‘मागेल त्याला काजू’ या शासनाच्या योजनेअंतर्गत पावस जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना शनिवारी (११ जुलै) काजू रोपांचे वाटप करण्यात आले. सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला विभाग प्रमुख विजय चव्हाण, उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेवजी कोकरे, पावस शाखाप्रमुख अभिजीत बळगे, मावळंगे शाखाप्रमुख विकासजी तावडे, ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ थूळ, युवा सेनेचे निलेश गजने यांच्यासह अनेक शिवसैनिक, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर यांनी केले होते. कार्यक्रमात कृषी सहाय्यक राऊत यांनी आयोजकांचे आभार मानत शेतकऱ्यांना काजू लागवडीची योग्य पद्धत, आवश्यक काळजी आणि या पिकातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पोमेंडी येथून रोपे आणण्यासाठी लागणारा वेळ व खर्च वाचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एकाच ठिकाणी काजू रोपे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ॲड. महेंद्र मांडवकर व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, युवा सेनेचे निलेश गजने, पावस शाखाप्रमुख अभिजीत बळगे, प्रवीण थूळ आणि कैलास आडवीरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, ‘मागेल त्याला काजू’ योजनेअंतर्गत ५ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी सुरू असून शासकीय रोपवाटिकांमध्ये काजू रोपे उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य ॲड. मांडवकर यांनी केले आहे.



