मधमाशा पालनासाठी ५० टक्के अनुदान; ‘मधकेंद्र’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : शेतकरी आणि सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य, मधपेट्या आणि यंत्रांसाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मधमाशा पालनामुळे पिकांचे परागीभवन होऊन शेती उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुकांना १० आणि २० दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण (राहण्या-जेवणासह) दिले जाणार आहे. १८ वर्षांवरील कोणतीही साक्षर व्यक्ती अथवा संस्था या योजनेसाठी पात्र आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अशी: ओळख व निवासाचा पुरावा (उदा. ओळखपत्र/प्रमाणपत्र), ७/१२ उतारा, शैक्षणिक दाखला, बँक पासबुक.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जेल रोड, कुलकर्णी कम्पाउंड (BSNL ऑफिस शेजारी), रत्नागिरी अथवा गिरीश पांचाळ (मोबाईल: ९४०४९६७६२१) यांच्याशी संपर्क साधावा.



