मुख्य बातमीसामाजिक

समत्व ट्रस्टतर्फे चवे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गेल्या १० वर्षांपासून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम; 'जे. पी. मोर्गन चेस' व आरंभ ट्रस्टचे सहकार्य

रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, खेड व रत्नागिरी तालुक्यातील दुर्गम भागांमधील शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेतून शैक्षणिक साहित्य आणि पाण्याच्या बॉटल वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘समत्व ट्रस्ट, ठाणे’ यांच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकतेच चवे गावातील चारही शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोकणात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्याच्या उद्देशाने आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांमध्ये योगदान देण्याच्या हेतूने समत्व ट्रस्ट सतत प्रयत्नशील असते. ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे व उपाध्यक्ष रूपेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. यंदा ‘जे. पी. मोर्गन चेस, मुंबई’ येथील कंपनीच्या सहकार्यातून तसेच आरंभ ट्रस्टच्या अध्यक्षा शोभा मूर्ती मॅडम यांच्या सहकार्यातून समत्व ट्रस्टच्या माध्यमाने हे मोलाचे शैक्षणिक किट उपलब्ध करून देण्यात आले होते.

चवे गावातील या साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी समत्व ट्रस्टचे विश्वस्त नरेंद्र खानविलकर, सदस्य रवींद्र महाडिक, ओरी केंद्राच्या नवनियुक्त केंद्रीय प्रमुख स्वाती भोगन, तसेच चवे निवई शाळेचे शिक्षणप्रेमी किसन सागवेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच चवे गावातील चवे निवई शाळेचे मुख्याध्यापक सुहास कानडे, चवे ओलपाट शाळेचे मुख्याध्यापक भावना कांबळे, उपशिक्षक विकास उगीले, चवे कुणबीवाडी शाळेचे मुख्याध्यापक सचिन गिरी, उपशिक्षक द्वारकदास दळवे यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चवे बौद्धवाडी शाळेचे मुख्याध्यापक राहुल अलकटवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चवे निवई शाळेचे उपशिक्षक सुवर्णसिंग बघेले यांनी मानले. समत्व ट्रस्टच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल चवे ग्रामस्थांकडून व सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!