सावर्डेतील वालावलकर रुग्णालयात २१ व २२ जुलै रोजी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील गरजू बालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (रत्नागिरी)’, ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ आणि ‘बीकेएल वालावलकर रुग्णालय (सावर्डे)’ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ जुलै रोजी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बीकेएल वालावलकर रुग्णालयात करण्यात आले आहे.
मुंबईचे प्रख्यात सर्जन डॉ. पारस कोठारी करणार शस्त्रक्रिया या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुंबई येथील प्रसिद्ध, अनुभवी आणि प्रख्यात बालशल्यचिकित्सक (पीडियाट्रिक सर्जन) डॉ. पारस कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पाडल्या जाणार आहेत.
शिबिरादरम्यान बालकांच्या पोटाचे आजार व पोटावरील शस्त्रक्रिया, जन्मतः असलेले विविध आजार व नवजात बालकांच्या शस्त्रक्रिया, लघवीचा त्रास आणि त्यासंबंधीच्या शस्त्रक्रिया, शरीरावरील गाठी व सूज काढण्याच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स आणि हर्निया यावरील शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातील.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, रुग्ण बालक आणि त्यांच्या पालकांकडे रेशन कार्ड, ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड) ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजू पालकांनी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नाव नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. सुमित सावंत यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक: ८८४७७९०१४९, ९२७२८९७८३४, ९९२२५६६६३९



