रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प

खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी (१७ जुलै) पुन्हा एकदा दरड कोसळली. माती आणि दगड रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी सातारा जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटला असून, घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
दरड कोसळलेल्या ठिकाणी खेड–अकलपे एसटी बस दीड तासांहून अधिक काळ घाटातच अडकून पडली होती. या बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि इतर प्रवासी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घाटमाथ्यापलीकडील गावांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांनाही रस्त्यातच थांबावे लागले असून, पुढे कसे जायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.
विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात याच ठिकाणी डोंगराचा मोठा भूभाग खचून रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. त्यानंतरही या परिसरात धोका कायम असतानाच पुन्हा मुसळधार पावसामुळे डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी आणि माती रस्त्यावर आली. धबधब्यांनी विक्राळ रूप धारण केल्याने रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असून, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या घाटातून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.



